MrJazsohanisharma

मेडिक्लेम पॉलीसीत नवे बदल | New changes to Mediclaim policy

New reforms in Mediclaim Policy
Mediclaim

मेडिक्लेम पॉलीसीत नवे बदल 

कोरोना संकटामुळे आता मेडिक्लेम पॉलिसीचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. मेडिक्लेम पॉलिसी ज्यांनी काढली आहे आणि एखाद्या आजारपणानंतर क्लेम साठी फिराफिर केली आहे, त्यांना चांगले माहीत झाले असेल की क्लेम सहजा सहज मंजूर होत नसतो. तसेच पॉलिसीचे नियम नीट न वाचल्यामुळे अनेक वेळा क्लेम नाकारला जातो. काही आजारांना तत्काळ विमासंरक्षण मिळते तर काही आजार काही महिन्यांनी तर काही आजार काही वर्षांनी विमा संरक्षणात येतात. आरोग्य विमा पॉलिसी अधिक सोपी व्हावी, पॉलीसीच्या नियमांचा ग्राहकांना नीट अर्थ समजावा आणि ही पॉलीसी लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आता आयआरडीएने म्हणजेच विमा नियामक व विकास प्राधिकरणने ( IRDA-Insurance Regulatory and Development Authority ) मेडिक्लेम पॉलिसीमध्ये नवे ग्राहकाभिमुख बदल लागू केले आहेत. ते खालील प्रमाणे-

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
  • नव्याने समावेश झालेले आजार
  • पॉलिसीत समाविष्ट नसलेले आजार
  • वेटिंग पिरिएड
  • सलग आठ वर्षे प्रीमियम भरणार्‍यांसाठी
  • टेलिमेडिसिनचा समावेश
  • प्रपोर्शनेट डिडक्शन सर्व घटकांना लागू नाही
  • नवीन कुपन पद्धती
  • प्रीमियम गिफ्ट कार्ड
  • प्री एक्झिस्टिंग डिसीज
  • प्रीमियममध्ये वाढ
  • निष्कर्ष

नव्याने समावेश झालेले आजार | Newly included diseases

नव्या बदलांनुसार आणि नियमांनुसार आता मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट असणार्‍या आजारांची संख्या वाढविली गेली आहे. आधी समाविष्ट नसलेले आजार जसे की मानसिक आजार, हॅझार्डस ऍक्टिव्हिटीमुळे होणारे आजार/अपघात, जन्मजात असणारे आजार, वयोमानानुसार होणारे आजार, कृत्रिम देखभाल, आनुवंशिक आजार, तारुण्य व रजोनिवृत्ती संबंधित आजार, मोतीबिंदू, गुडघ्याचे प्रत्यारोपण, कामाच्या ठिकाणी असणार्‍या परिस्थितीमुळे उदभवणारे त्वचा रोग अथवा अस्थमा या आजारांचा आता पॉलिसीमध्ये समावेश असणार आहे.     
याशिवाय आता इम्युनोथेरपी, ओरल केमोथेरपी व रोबोटिक सर्जरी ( Immunotherapy, oral chemotherapy and robotic surgery ) यांसारख्या आधुनिक उपचार पद्धतींचा पॉलिसी कव्हरमध्ये समावेश होणार आहे.

पॉलिसीत समाविष्ट नसलेले आजार | Diseases not covered by the policy 

तसेच ज्या आजारांचा मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समावेश करायचा नसेल, त्या आजारांचा स्पष्टपणे पॉलिसीत उल्लेख असणे आवश्यक आहे. उदा. एचआयव्ही/एड्स, एपिलप्सी (अपस्मार)  ( HIV / AIDS, Epilepsy )

वेटिंग पिरिएड | Waiting period

पॉलिसीधारकास वेटिंग पिरिएडचा अर्थ आणि त्याचा कालावधी नीट समजण्यासाठी पॉलिसीत वेटिंग पिरियडचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक केले गेले आहे. वेटिंग पिरिएड कालावधी ३० दिवस ते एक वर्षाइतका असू शकतो. प्रत्येल विमा धारकास हे माहीत हवेच की वेटिंग पिरिएड या कालावधीत आजार उदभवल्यास क्लेम मिळत नाही.

सलग आठ वर्षे प्रीमियम भरणार्‍यांसाठी  | For premium payers for eight consecutive years 

ज्या पॉलिसीधारकाने सलग आठ वर्षे प्रीमियम नियमित भरला आहे, अशा पॉलिसीधारकाचा क्लेम नवव्या वर्षापासून नाकारता येणार नाही. हा सुरुवातीचा आठ वर्षांच्या कालावधी मोरॅटोरियम पिरीयड- Moratorium Period असेल.

टेलिमेडिसिनचा समावेश | Inclusion of telemedicine

कोरोना आणि त्यामुळे लागू झालेले लॉकडाऊन-अनलॉक याचा विचार करता सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व वाढले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या Social distance  उद्देशाने आता टेलिमेडिसिनचा समावेश पॉलिसीत करण्यात येणार आहे.

प्रपोर्शनेट डिडक्शन सर्व घटकांना लागू नाही | The proportionate deduction does not apply to all components 

अगोदर हॉस्पिटलचे रूम चार्जेस पॉलिसीतील रूम चार्जेसपेक्षा जास्त असतील तर त्या हिशोबाने सर्व घटकांची प्रमाणित कपात (प्रपोर्शनेट डिडक्शन) केली जायची. आता नवीन नियमांनुसार क्लेम सेटल करताना प्रमाणित कपात (प्रपोर्शनेट डिडक्शन) करता येणार नाही व त्यासाठी संबंधित वैद्यकीय खर्चाचा (असोसिएट मेडिकल एक्स्पेन्सेस) पॉलिसीत उल्लेख करावा लागणार आहे. यात औषधे, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबींचा समावेश असणार नाही. म्हणजेच हॉस्पिटलचे रूम चार्जेस जरी पॉलिसीतील रूम चार्जेसपेक्षा जास्त असले, तरी क्लेम डिडक्शन केवळ रूम चार्जेसमध्येच होईल; अन्य घटकांच्या खर्चासाठी होणार नाही.

नवीन कुपन पद्धती | New coupon methods

आरोग्य विमा कंपनी पॉलिसीधारकास जिम (व्यायामशाळा), योग सेंटर, स्पोर्ट्स क्लब, हेल्थ सप्लिमेंट यासाठी कुपन देण्याची सुविधा उपलब्ध करू शकतील.

प्रीमियम गिफ्ट कार्ड | Premium gift cards

अनेक पैशासबंधी व्यवहार करणार्‍या कंपन्या विक्रीवाढीसाठी गिफ्ट कार्ड देऊ करतात. तसाच काहीसा प्रकार विमा कपन्या आता करू शकणार आहेत. मिळालेल्या गिफ्ट कार्डचे करायचे काय? तर असे गिफ्ट कार्ड मिळणारी व्यक्ती त्या कंपनीच्या मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम भरू शकतील. हा प्रकार नवीन असल्याने याबाबत ग्राहकाने संबंधित विमा कंपनीकडून अधिक माहिती घ्यावी.

प्री एक्झिस्टिंग डिसीज | Pre-existing disease

मेडिक्लेम पॉलिसी काढतांना अगोदर कोणते आजार आहेत का? याबाबत माहिती विचारली जाते. हे फार महत्त्वाचे आहे. कारण नव्या नियमानुसार पॉलिसी घेतलेल्या तारखेपासूनच्या आधीच्या ४८ महिन्यांत निदान झालेल्या आजारास प्री एक्झिस्टिंग डिसीज समजण्यात येणार आहे. तसेच पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत एखाद्या रोगाचे निदान झाल्यास त्यास प्री एक्झिस्टिंग डिसिज समजण्यात येणार नाही. प्री एक्झिस्टिंग डिसीजला विमा संरक्षण मिळेल की नाही, केव्हा मिळेल याबाबत बरीच संदिग्धता असते, याविषयी बरीच माहिती संबंधित पॉलिसीच्या कागदपत्रांमध्ये उपलब्ध असली तरी त्याचा स्पष्ट अर्थ सामान्य विमा धारकाला समजू शकत नाही. म्हणून विमा धारकाने पॉलिसी काढण्याच्या अगोदर प्री एक्झिस्टिंग डिसीजच्या नियमांबाबत संबंधित विमा कंपनीच्या एजण्ट कडून नीट माहिती घ्यावी.

प्रीमियममध्ये वाढ | Increase in premium

नव्या बदलांमुळे आणि नियमांमुळे आता मेडिक्लेम पॉलिसी आधीपेक्षा जास्त समावेशक व फायदेशीर झाली आहे. मात्र त्यामुळे प्रीमियममध्ये वाढ होणार आहे. ही वाढ काही विमा धारकांनी अनुभवली असेलच. 

निष्कर्ष (Conclusion)-

आपण जर अगोदरच मेडिक्लेम पॉलीसी काढली असेल किंवा आता पहिल्यांदा मेडिक्लेम पॉलीसी काढणार असाल तर वरील नियम आवश्यक वाचा. हे नियम अजिबात गुंतागुंतीचे नसून आपल्या म्हणजे सर्व पॉलिसीधारकांच्या फायद्याचे आहेत.

माहिती संकलन-
- योगेश रमाकांत भोलाणे

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने