मधमाश्यांचे उपयुक्त विष - Apitoxin
शेतीक्षेत्राच्या दृष्टीकोनातून मधमाश्यांचा परागीभवनासाठी उपयोग होतो, हे तर सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मधमाश्यांचा मध, पराग, राजान्न, प्रोेपोलिस, मेण आदी पदार्थ मिळविण्यासाठी देखील उपयोग होतो. परंतु अलिकडे मधमाश्यांच्या विषाला मागणी वाढत चालली आहे. मधमाशीचे विष सांधेदुखी व हाडाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. संधीवातावरील औषध, रक्त दाब कमी करणेचे औषधामध्ये, काही डोळ्यांच्या व त्वचेच्या आजारात, रक्तातील कोलेस्टिरॉल चे प्रमाण कमी करण्यासाठी तयार करण्यात येणार्या औषधातही मधमाशीच्या विषाचा उपयोग केला जातो.काही डॉक्टरांच्या मते मल्टीपल स्क्लेरॉसिस, फायबोमायलजिया याविकारांवर तसेच कॅन्सर, एपिलेस्पी, डिप्रेशन अशा आजारांवर या विषाचे यशस्वी उपचार केले जात आहेत. मक्षमाश्यांचे विष म्हणजे काय? त्याचा आपल्या आरोग्याला फायदा कसा होतो? याबाबत फारच कमी माहिती आपल्याला आहे.
या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
- मधमाश्यांतील श्रमविभागणी
- मधमाश्यांच्या विषातील घटक
- एपिटॉक्सीन आणि एपीथेरपी
- मधमाशीचे उपयुक्त विष
- निष्कर्ष
मधमाश्यांतील श्रमविभागणी | Division of labor in bees
खरंतर मधमाश्या तोंडाने चावत नाहीत, त्यांच्या मागील भागात डंख(स्टींग) असतात, या डंखात एक काटा असतो. प्रत्यक्षात हा डंख तीन अणकुचीदार सुयांचा बनलेला असतो. त्या सुयात एक लांब पोकळी किंवा विषमार्ग असतो. त्यात विषाची पिशवी असते. त्यातून पाहिजे त्यावेळी विष टाकले जाते. परंतु जो दिसेल त्याला मधमाश्या चावत नाहीत. मधमाश्यांतील श्रमविभागणीनुसार १८ ते २० दिवस वयाच्या मधमाश्या संरक्षणदलात भरती होतात. त्यांची टेहळणी चालू असते. बाहेरून मकरंद-पराग घेऊन येणार्या मधमाश्या आपल्याच कुटुंबातील आहेत, याची खात्री पटल्यावरच त्यांना प्रवेश दिला जातो. घुसेखोर मधमाश्या किंवा इतर शत्रू यांना त्या आव्हान देतात. शत्रू निघून गेल्यास ठीक नाहीतर त्यांच्यावर हल्ला करतात.मधमाश्यांच्या संरक्षणाच्या दोन अवस्था असतात. संरक्षण दलातील मधमाश्यांना शत्रुची चाहूल लागली की त्यांच्या ग्रंथीमधून विशिष्ट संप्रेरकाचा ( फेरोमॉन) थोडासा स्त्राव होतो. या संप्ररेकाच्या गंधामुळे इतर मधमाश्यांना संभाव्य धोक्याची सूचना दिली जाते आणि त्यांची संरक्षणदलात भरती केली जाते.
शत्रू निघून गेला, की संप्रेरक -Hormones स्त्रवणाचे काम थांबते आणि सर्व मधमाश्या आपल्या नित्य उद्यागेास लागतात. वसाहतीस धोका वाढू लागला, तर संरक्षक दलातील मधमाश्या शत्रूवर हल्ला चढवितात. शत्रूच्या मांसल शरीरामध्ये नांगी घुसवितात. या नांगीला उलटे काटे असल्याने शत्रुच्या शरीरात घुसलेली नांगी त्यांना बाहेर खेचून घेता येत नाही. म्हणून बर्याचवेळा नांगी बाहेर बाहेर खेचण्याच्या प्रयत्नात नांगी शत्रूच्या शरीरात अडकते आणि मधमाशीचे पोट फूटन रक्तस्त्राव होऊन मधमाशी मरते. शत्रूच्या शरीरात रूतलेल्या नांगीवरील विषकुपीतील निघणारा उग्र गंध इतर मधमाश्यांना शत्रूवर हल्ला करण्याचा आदेश देतो. मग इतर शेकडो मधमाश्या या लक्षावर तुटून पडतात.
मधमाश्यांच्या विषातील घटक | Constituents in bee venom
१) विकर (एन्झाइम -Enzymes) -यामध्ये फॉस्फोलायपेज - Phospholipase हे मुख्य असते, या विकरामुळे रक्तपेशी आणि चेतापेशीचा ( Blood cells and nerve cells ) नाश होतो.
२) प्रथिने( Proteins) -यात मेलिटिन ( Melitin ) ५० टक्के आणि अपामाईन (Apamine) ३ टक्के या प्रथिनांचा समावेश असतो.
३) अमाईन्स ( Amines) - यामध्ये हिस्टामाईन आणि डोपोमाईन ( Histamine and dopamine ) यांचा समावेश असतो. ही प्रथिने विजातीय असल्याने आपल्या शरीरात प्रतिक्रिया सुरू होते. दंशाचे जागी आग आणि वेदना होणे, कंड सुटणे, त्वचा लाल होणे, सुजणे हे प्रकार होतात. व्यक्तीचे वजन आणि दंश केलेल्या मधमाश्यांची संख्या यावर प्रतिक्रियेची तीव्रता अवलंबून असते. २-५ मधमाश्या चावल्यास ५-६ तासात लक्षणे कमी होतात. खूप मधमाश्यांच्या दंशामुळे घाम येणे, उलटी होणे अशी तीव्र लक्षंणे दिसतात. अमेरिकेतील अहवालानुसार ५०० ते ७०० मधमाश्यांना दंश होऊनही माणसे दगावल्याची उदाहरणे नाहीत. साधारण एक हजार मधमाश्यांच्या विषग्रंथीत जेवढे विष असते तेवढे विष एका सापाच्या विषग्रंथीत असते. मधमाश्या आपणहून दंश करीत नाहीत. त्यांच्या मोहोळाच्या जवळ जाणे, माणसाचा गरम उच्छवास, त्यास येणारा उग्र वास, जोराच्या हालचाली मधमाश्यांना दंश करण्यास उद्युक्त करतात.
एपिटॉक्सीन आणि एपीथेरपी
मधमाश्या मोठ्या प्रमाणात चावल्यावर त्याचा माणसाच्या आरोग्यावर दुष्परिणामच होतो, परंतु नियंत्रित स्थितीत मधमाश्या चावून घेतल्यास त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. इलाजासाठी तज्ञ व्यक्तीच्या नियंत्रणाखाली प्रौढ मधमाश्यांचा डंख मारून घेतला जातो. आता तर आधुनिक तंत्रज्ञानाने मधमाश्यांचे विष काढून इंजेक्शनवाटे ते टोचण्याची सुविधा तयार केली आहे. विष संकलनासाठी विजेच्या सौम्य धक्क्याचा वापर केला जातो. मोहोळात प्रवेश करणार्या माशांना विजेच्या जाळीवर चालवतात. त्यामुळे मधमाश्या काचेवर बसविलेल्या रेशमी कापडाला डंख मारतात. त्यामुळे कापडात थेंब-थेंब विष जमा होते. नंतर त्याचे स्फटिकीभवन केले जाते आणि असे विष शुद्ध करून त्याचीे इंजेक्शन बनविली जातात.मधमाश्यांच्या विषाला एपिटॉक्सीन तर मधमाश्यांच्या विषाला माणसाच्या आरोग्यावर उपचारसंबधी शास्त्राला एपीथेरपी असे म्हणतात.
मधमाशीचे उपयुक्त विष | Useful bee venom
फार पूर्वीपासून मधमाशीचे विष सांधेदुखी व हाडाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. रशियात डोक्याच्या उपचारासाठी मधमाश्यांचे विष वापरले जाते. मधमाश्यांच्या विषाचा उपयोग संधीवातावरील औषध, रक्त दाब कमी करणेचे औषधामध्ये, काही डोळ्यांच्या व त्वचेच्या आजारात, रक्तातील कोलेस्टिरॉल चे प्रमाण कमी करण्यासाठी तयार करण्यात येणार्या औषधात केला जातो. तसेच काही डॉक्टरांच्या मते मल्टीपल स्क्लेरॉसिस, फायबोमायलजिया याविकारांवर सुद्धा मधमाश्यांच्या विषांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. आतातर कॅन्सर, एपिलेस्पी, डिप्रेशन अशा आजारांवर या विषाचे यशस्वी उपचार केले जात आहेत. लैेंगिक दुर्बलतेवरील उपचारावरसुद्धा काही डॉक्टरांनी या विषाचा उपयोग केला आहे. मधमाश्यांचे उपचार सुरू करण्यापुर्वी रोगीला मधमाशांच्या विषाची ऍलर्जी आहे का, हे तपासणे महत्त्वाचे असते. कारण साधारण २ टक्के लोकांना या विषाची ऍलर्जी असल्याचे आढळून आले आहे. मधमाश्यांचे विष शरीरात गेल्यावर नेमके काय होते याबाबत सुद्धा संशोधन झाले आहे.
मधमाशांचे विष शरीरात गेल्यास होणार परिणाम | Effects of bee venom if ingested
मधमाश्यांचे विष विशिष्ट पद्धतीद्वारे शरीरात सोडल्यास सर्वप्रथम रक्तवाहीन्यांमधील रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. प्लाज्मॅटिक Plasmatic निष्क्रीय होते. त्यानंतर एण्डोजेन कॉर्टीकोस्टीरॉईडचे ( endogenous corticosteroids ) स्त्रवण वाढते. त्यामुळे हेमोरेजिक परिणाम (Hemorrhagic effect ) दिसून येतो. त्यामुळे हायपोफिसरी सिस्टीम आणि सुप्रारिनल कॉर्टेक्स ( The hypothalamic system and the suprarenal cortex ) प्रभावीत होते. हे हायपोटेन्सीव्ह (Hypotensive ) असते. तसेच या विषामुळे सेंट्रल आणि पेरिफेरिक नर्व्हस सिस्टीमचे मेटॅबोलिझम (Metabolism of the central and peripheral nervous system ) वाढते. तसेच यामुळे स्टीरॉईड हार्मोन्सचे डिप्रेशन बंद ( Depression of steroid hormones stops ) होते. तसेच बॅक्टेरिओस्टॅटीक , लोकल ऍनेेस्थेटीक , ऍण्टीरूमॅटीक ( Bacteriostatic, Local Anesthetic, Antirumatic ) असे परिणाम सुद्धा दिसतात.मधमाश्यांच्या विषावर अभ्यास करणार्या डॉक्टरांच्या मते या विषाचा ५०० पेक्षा जास्त आजारांवर, विकारांवर आणि मानसिकरोगांवर उपचार होऊ शकतो. कारण या विषामध्ये ४० प्रकारची रसायने कार्यरत असतात. अजुनही यावर परिपूर्ण संशोधन व्हायचे बाकी आहे. सध्या माणसाच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी अनेक पॅथी आहेत, त्यांच्या तुलनेत मधमाश्यांच्या विषाचे उपचार स्वस्त पडतात. मधमाश्यांवर चांगल्या प्रकराचे संशोधन झाल्यास एक नवीन पॅथी उपचारसाठी उदयास येईल आणि अनेक दुर्धर आजार बरे करता येतील.
माहिती संकलन-- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author
Read more about author
हे सुद्धा वाचा-