Fodder revolution |
गरज चारा क्रांती कार्यक्रमाची
जसे शेतीमध्ये कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेतरी पाण्याच्या उपलब्धतेशिवाय हे सर्व तंत्रज्ञान बिनकामाचे ठरते. त्याचप्रमाणे दुग्धव्यवसायात सुद्धा संकरित जनावरे, आधुनिक गोठे, लसीकरण अशा अनेक बाबी अंगिकारल्या तरी सकस व पौष्टीक चार्याच्या अभावी दुग्धव्यवसाय यशस्वीच होऊ शकत नाही. वाढती जागतिक लोकसंख्या आणि शेतीयोग्य जमीन कमी होत असताना पशुधनाच्या खाद्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चारा क्रांती आवश्यक आहे. पारंपारिक चारा उत्पादन हे फारसे फायदेशीर दिसत नाही. हायड्रोपोनिक आणि शाश्वत चारा लागवड पद्धतींमधील नवकल्पना उत्पन्न वाढवू शकतात, पोषण गुणवत्ता सुधारू शकतात आणि पाण्याचा वापर कमी करू शकतात. या क्रांतीचा उद्देश पशुधन उद्योगाला सातत्यपूर्ण, उच्च-गुणवत्तेचा खाद्य पुरवठा सुनिश्चित करणे, ज्यामुळे पशु आरोग्य आणि उत्पादकता वाढते. याव्यतिरिक्त, ते नैसर्गिक संसाधनांवरील दबाव कमी करू शकते, अन्न सुरक्षेला प्रोत्साहन देऊ शकते आणि भविष्यातील जागतिक अन्न मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या शाश्वत कृषी पद्धतींमध्ये योगदान देऊ शकते.
या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
- दुग्धव्यवसायचे महत्त्व
- दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी
- दूध उत्पादन आणि चारा यांचा संबंध
- निष्कर्ष
दुग्धव्यवसायचे महत्त्व | Importance of dairy farming
हरितक्रांती ( green revolution ) , धवलक्रांती ( Milk Flood ) अशा अनेक प्रकारच्या क्रांत्या, आपल्या देशाने फार मोठे उच्चांक गाठत यशस्वी केल्यात. दिवसेंदिवस कृषी क्षेत्रात उत्पादनाचे नवनवीन तंत्रज्ञान ( Modern Technology ) विकसित होत आहे. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असलातरी आजची शेती ही बेभरवशाचीच ठरत आहे. आज शेतकर्यांच्या आत्महत्या हा कृषी क्षेत्रातील सर्वात चिंतेचा मुद्दा समजला जातो. यावर उपाय म्हणून दुग्धव्यवसाय ( Dairy ), शेळी-मेंढीपालन, कुक्कूट पालन ( Poultry ), ससेपालन अशा प्रकारचा किमान एकतरी जोडधंदा शेतकर्यांनी सुरू करावा, असा सल्ला शेतीतज्ञांकडून दिला जातो. या सल्ल्यानुसार अनेक शेतकरी स्वखर्चाने किंवा शासनाच्या विशिष्ट योजनांच्या आधारे जोडधंदा सुरू करतात. शेतीस निगडीत जोडधंद्यापैकी दुग्धव्यवसाय या जोडधंद्यास शेतकर्यांची पसंती अधिक मिळते.
परंतु दुग्ध व्यवसायात खाद्यावरील खर्च सर्वात जास्त म्हणजे ७० टक्के पर्यंत होत असतो. त्यामुळे या व्यवसायातील नफ्यावर फार मोठा परिणाम होतो. शेतकर्यांनी हा खर्च करून दुग्धव्यवसायास सुरूवात जरी केली तरी चार्याची उपलब्धता कशी करावी असा प्रश्न शेतकर्यांपुढे पडतो. दुग्धव्यवसायापुढे असलेल्या चार्याच्या टंचाईचा सामना शेतकर्यांना दरवर्षी विशेषत: उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. परंतु दरवर्षी उदभवणार्या चार्याच्या टंचाईच्या संकटाचा मुकाबला करण्याबाबत शासन आणि त्यासोबत शेतकरी सुद्धा गंभीर नसतात असे आढळून आले आहे.
दुग्ध व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी | To make the dairy business profitable
कमी खर्चात जास्तीतजास्त दुध उत्पादनाचे तंत्र हस्तगत करून दुग्ध व्यवसाय किफायतशीर करता येतो. त्यासाठी चांगल्या संकरित गाईंची निवड, समतोल आहार, आरोग्य व्यवस्थापन , दुध विक्री नियोजन ( Selection of crossbred cows, balanced diet, health management, milk marketing planning ) इ. बाबींचे नियोजन फार महत्त्वाचे असते. उत्तम प्रकारे दुध व्यवसाय करण्यासाठी आणि दुधाचे सातत्य टिकून राहण्यासाठी दुधाळ जनावरांच्या खाद्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
शिफारस केल्याप्रमाणे जनावरांना खाद्य पुरविल्यास या व्यवसायात खाद्यावरील खर्च सर्वात जास्त म्हणजे ७० टक्के पर्यंत होतोच. म्हणून कमी खर्चात जास्तीत जास्त पौष्टीक चारा, उत्पादनाचे अद्यावत लागवड तंत्र याविषयी शेतकर्यांनी विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. कारण बदलत्या परिस्थितीत दुग्धोत्पादना विषयीच्या नवनवीन माहितीबाबत जागरूक राहून आधुनिक विज्ञानाची कास धरली तरच या व्यवसायात भरीव वाढ होऊन दरडोई उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.
जसे शेतीमध्ये कितीही आधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेतरी पाण्याच्या उपलब्धतेशिवाय हे सर्व तंत्रज्ञान बिनकामाचे ठरते. त्याचप्रमाणे दुग्धव्यवसायात सुद्धा संकरित जनावरे, आधुनिक गोठे, लसीकरण अशा अनेक बाबी अंगिकारल्या तरी सकस व पौष्टीक चार्याच्या अभावी दुग्धव्यवसाय यशस्वीच होऊ शकत नाही. म्हणून संकरित जनावरांचे संगोपन आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी उत्तम व्यवस्थापन व त्याचबरोबर सकस हिरवा चारा वर्षभर उपलब्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक शेतकर्याने वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी चारा पिके उत्पादनाचे नियोजन करून सुधारित तंत्राने लागवड करून अधिक दुध उत्पादनाच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. चारा पिकांच्या सुधारित वाणांची लागवड व जास्तीजास्त हिरवा चारा व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करणे आवश्यक आहे.सध्या शेततळ्याच्या योजनांना शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला, कारण पीक वाढीच्या एखाद्या टप्प्यात पाऊसाने दांडी मारलीतर शेततळ्यातील राखीव पाणी पिकांना जीवदान देऊ शकते. तसाच विचार शेतकर्यांनी दुग्धव्यवसाय करतांना अवलंबला पाहिजे. चार्याची टंचाई दरवर्षी उन्हाळ्यात भासते, तेव्हा धावपळ केल्यापेक्षा आपल्या शेतातील जमिनीचा एक भाग नेहमीच चारा पिकांसाठी वर्षभर राखीव ठेवला पाहिेजे.
चार्याच्या टंचाईच्या वेळेस आपल्याकडीलच चारा आपल्या व्यवसायाला मोलाची मदत करू शकतो. खरंतर चार्याची वर्षभर उपलब्धता कशी होईल याचा विचार करूनच दुग्धव्यवसाय सुरू केला पाहिजे. चार्याच्या उपलब्धतेबाबत निश्चिती नसेलतर आपल्या शेतातूनच वर्षभर चारा मिळण्यासाठी नियोजन केले पाहिजे. त्यासाठी चारा पिकांच्या सुधारीत वाणांची लागवड, कमीतकमी खर्चात जास्तीजास्त उत्पादन वाढीचे तंत्र, चारा साठवण (मूरघास) पद्धतीचा अवलंब या बाबी शेतकर्यांनी अभ्यासणे गरजेचे आहे.
पशुधन व्यवस्थापनात चारा | Fodder in Livestock Management
पशुधन व्यवस्थापनात उच्च प्रतीचा चारा नियमित आणि वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. निरोगी पशुधन राखण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि पशुधन शेतीमध्ये आर्थिक आणि पर्यावरणीय टिकाऊपणाला प्रोत्साहन देण्यासाठी चारा लागवड, वापर आणि संवर्धनासाठी योग्य ओरकारचे नियोजन आवश्यक आहे. पशुधन व्यवस्थापनात चारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. कारण चाऱ्याची गुणवत्ता आणि उपलब्धता पशुधनाचे आरोग्य, उत्पादकता पशुधन व्यवसायाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. काही पशुपालक शेतकरी विशेषतः उच्च दर्जाचा चारा देण्यासाठी चारा पिकांची लागवड करतात. यामध्ये अल्फाल्फा, क्लोव्हर आणि विविध गवत या पिकांचा समावेश आहे. पशुधन व्यवस्थापन आणि चारा हे खालीलप्रमाणे एकमेकांशी संबंधित आहेत :
- जनावरांचे पोषण: चारा हा पशुधनासाठी प्राथमिक पोषणाचा स्रोत आहे. संतुलित आहार जनावरांना प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतो.
- उत्पादकता: वाढीचा दर, पुनरुत्पादन आणि दूध किंवा मांस उत्पादनासाठी दर्जेदार चाऱ्याचे योग्य पोषण अतिशय महत्त्त्वाचे असते.
- पुनरुत्पादन: पुरेशा चारासहित पुरेसे पोषण हे पशुधनाच्या पुनरुत्पादक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. हे प्राण्यांची प्रजनन क्षमता, गर्भधारणेचे यश आणि संततीचे आरोग्यासाठी उपयुक्त असते.
दूध उत्पादन आणि चारा यांचा संबंध | Relationship between milk production and fodder
आपल्याकडे पावसाळ्यातील ३-४ महिने व हिवाळ्यातील जास्तीजास्त ३ महिने हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु वर्षातील उरलेल्या ४-५ महिन्यात म्हणजेच उन्हाळ्यात दरवर्षी तीव्र प्रमाणात चारा टंचाई भासते. त्यामुळे हिरव्या चार्या अभावी गाई-म्हशी दूध कमी देतात. परंतु मुरघास या अडचणींवर मात करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. खरंतर आजही बरेच शेतकरी मूरघासबाबत अनभिज्ञ आहेत. मुरघास म्हणजे विशिष्ट वेळी हिरवा चारा कापून कुट्टी यंत्रात कुट्टी करून योग्य पद्धतीने बनविलेल्या सायलोपीटमध्ये हवाबंद पद्धतीने साठवून ही कुट्टी त्या मुरविली जाते. अशा मुरलेल्या चार्यास मूरघास असे म्हणतात. थोडक्यात मूरघास म्हणजे मुरवलेला हिरवा चारा. या प्रकारे हिरवा चारा साठवून चारा टंचाईच्या काळात वापरता येतो.
पशुधनासाठी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा , यासाठी एकात्मिक तंत्रज्ञान आणि प्रक्रियेद्वारे चारा उत्पादन वाढविण्यावर सरकारचे सुद्धा प्रयत्न असतात. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चारा उत्पादन वाढविण्यासाठी मोहीम राबविली जाते. पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू असलेल्या चारा विकास कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी १२ राज्यांना सरकारने ११९.५ कोटी रूपये दिले होते. त्या महाराष्ट्राला १५ कोटी रूपये मिळाले होते. परंतु शासनाचे हे प्रयत्न अपूरे पडतात. कारण देशाच्या कृषी उत्पादनात ३२ टक्के हिस्सा असलेल्या पशुधनासाठी देशाच्या एकूण पीक क्षेत्रापैकी केवळ ४ टक्केच क्षेत्रावर चारा उत्पादन होते. म्हणून जशी हरितक्रांती झाली, धवल क्राती झाली त्याप्रमाणे चारा क्रांतीचा कार्यक्रम कसा आखता येईल, याकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपल्याकडील लोकसंख्या, पशुसंख्या आणि दूध उत्पादनाचे आकडे अभ्यासता तात्पुरते, हंगामी उपाय कुचकामी ठरणार आहेत. चारा क्रांती सारखा ठोस कार्यक्रमच चारा टंचाईवर सध्यातरी उत्तम पर्याय आहे.
निष्कर्ष ( Conclusion)-
अशाप्रकारे हिरव्या चार्याच्या या समस्येवर शेतकरी आणि शासन अशा दोन्ही स्तरावरून सारखेच प्रयत्न होणे आवश्यक आहे. सरकारने चारा लागवड क्षेत्रात वाढ कशी होईल यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शेतकर्यांनी आपल्याकडील शेतजमिनीचा विशिष्ट भाग वर्षभर चारा लागवडीखाली आणणे गरजेचे आहे. दोन्ही स्तरावरून प्रयत्न झाले तरच हिरव्या चार्याच्या समस्येचा शेतकर्यांना मुकाबला करता येईल.
- योगेश रमाकांत भोलाणे
---------------------------------
हे सुद्धा वाचा-
हे सुद्धा वाचा-