व्देषपूर्ण नजर | Hateful look

कुठलाही ठोस पुरावा नसतांना डिटेक्टिव्ह अविनाश यांनी केवळ तर्कशास्त्राच्या आधारे खूनी शोधून काढला. अतिशय उत्कंठावर्धक अशी ही घटना.

Hateful look by culprit
Hateful look

व्देषपूर्ण नजर

‘‘ माझा मुलगा अशोक आत्महत्या करूच शकत नाही, हा खूनच आहे.’’असे राठीसेठ मोठ्याने ओरडत होते. दवाखान्यात,पोस्टमार्टमच्या ठिकाणी आणि आता अत्यंविधीच्या ठिकाणीही हे एकच वाक्य त्यांच्या तोंडून येत होते. त्यांची ही अवस्था त्यांचे फॅमिली डॉक्टरांना पहाविली नाही. म्हणून त्यांनी राठीसेठ यांची परवानगी घेऊन यात डिटेक्टिव्ह अविनाशला लक्ष घालायला सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळीच डिटेक्टिव्ह अविनाश राठीसेठ यांच्या घरी हजर झाला. राठीसेठ यांची बायको, नातेवाईक आणि अशोकचे मित्र हॉलमध्ये बसून राठीसेठ यांचे सांत्वन करीत होते. अविनाशने स्वत:ची ओळख करून दिली आणि येण्याचे कारण सांगितले. कारण ऐकताच राठीसेठ यांची पत्नी मनीषा म्हणाली,
‘‘ पोलिसांनी सर्व चौकशी केली आहे, ही आत्महत्याच आहे. या घटनेची पुन्हा पुन्हा चौकशी करून आम्हाला दु:ख देऊ नका, आम्हाला आणखी चौकशीची गरज नाही.’’

कोणताही पुरावा नाही, केवळ तर्कशास्त्र | No evidence, only logic 

‘‘ तुमच्याकडून याच संवादाची अपेक्षा होती. तुम्ही राठीसेठ यांच्या दुसऱ्या पत्नी नाही का? पहिली पत्नी वारल्यानंतर तीन वर्षांपूर्वी तुमचा विवाह झाला. अशोक हा तुमचा मुलगा नव्हता. तुम्हाला सर्व संपत्ती हवी होती, म्हणूनच तुम्ही अशोकचा खून केला, असे मी म्हटले तर? ’’ डिटेक्टिव्ह आपल्यावरच थेट आरोप करतो, हे बघून मनीषाने शांतच राहणे पसंत केले. अविनाश पुढे म्हणाला, ‘‘तुमच्या सद्यस्थितीची मला जाणीव आहे, तरीपण चौकशी करणे गरजेचे आहे. मी आता अशोकची खोली तपासतो आणि नंतर इतर सर्वांची चौकशी करणार आहे, तोपर्यंत कुणीही बाहेर जायचे नाही.’’ अविनाशने सर्वांना तंबी दिली आणि मनीषाने हातात घातलेल्या हातमोजांनी अविनाशचे लक्ष वेधले, तो म्हणाला. ‘‘ मिसेस मनीषा राठी, तुम्हाला थंडी वाजत असेल तर तुम्ही तुमच्या खोलीत गेले तरी चालेल.’’ हे ऐकल्यावर मनीषा चरफडत निघून गेली, मात्र तिच्या खोलीत शिरेपर्यंत तिचे मन बदलले आणि पुन्हा ती हॉलमध्ये हजर झाली.

अविनाशने अशोकच्या खोलीची तपासणी सुरू केली. त्याची खोली अतिशय व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. कपाटात इस्त्री केलेले कपडे रचून ठेवले होते.टेबलावर अभ्यासाची पुस्तके होती. त्याच्या वहीत त्याने काही अभ्यासाच्या नोटस् काढलेल्या दिसल्या. अलार्मच्या घड्याळात सकाळी ५:३०चा अलार्म लावलेला दिसला. कोपर्‍यात एका जाळीच्या बॅगेत फुटबॉल दिसला आणि दाराजवळ स्पार्टस् शूज दिसले. नोकरांची चौकशी केल्यावर त्याला समजले की अशोक रोज सकाळी ५:३० ला उठायचा. सकाळी ७ च्या सुमारास तो फुटबॉलच्या प्रॅक्टिसला जायचा, त्यांनतर घरी आल्यावर भोजन करून कॉलेजला जायचा. याशिवाय नोकरांनी मनीषा आणि राठीसेठ यांच्या दिनचर्येबाबतही माहीती पुरविली. मित्रांची चौकशी केल्यावर समजले की ज्या दिवशी अशोकचा मृत्यू झाला, त्या दिवशी अशोकची कॉलेजमध्ये परीक्षा होती आणि त्यानंतर फुटबॉलची मॅचही होती. चौकशी सुरू असतांना अविनाशला या केसची चौकशी करणाऱ्या इन्सपेक्टर बागुल यांचा फोन आला. त्यांनी पोस्टमार्टमच्या रिपोर्ट बाबत, अशोकने लिहिलेल्या मृत्युपूर्वीच्या चिठ्ठीबाबत आणि एकूणच पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीबाबत माहिती दिली. नंतर अविनाशने इन्सपेक्टर बागुल यांना काही सुचना केल्या आणि सर्वांना ऐकू येईल एवढ्या मोठ्याने तो म्हणाला,‘‘इन्सपेक्टर साहेब, दोन तासांनी येथे या, तोपर्यंत खरा खूनी मी शोधून ठेवतो.’’ अविनाशने फोन कट केला. मात्र त्याच्या या संभाषणामुळे तेथे जमलेल्या बहुतेक लोकांच्या मनातील धडधड वाढली.

नंतर अविनाशने राठीसेठ यांच्याशी एकांतात काही चर्चा केली. त्यांच्या वकीलांची फोनवरून चौकशी केली. अशोकचे पोस्टमार्टम केलेले डॉक्टर, इन्सपेक्टर बागुल, डॉ.बच्छाव यांच्याशी अविनाशने वारंवार फोनवरून संभाषण केले. त्यानंतर अविनाशने घरातील सर्वांच्या खोल्या तपासल्या. देवरेसर आल्याची सुचना मिळाल्यावर अविनाश हॉलमध्ये आला आणि बाजूला जाऊन त्यांच्याकडून काही माहिती घेतली. देवरेसरांशी बोलतांना अविनाश वारंवार मनीषाकडे बघून तिच्या चेहर्‍यावरील भाव टिपण्याचा प्रयत्न करीत होता. स्वयंपाक बनविणाऱ्या महिला नोकरांची चौकशी करतांना इन्सपेक्टर बागुल आले. आता खुनी पकडला जाईल आणि तो आपल्यापैकीच कुणीतरी आहे, या भावनेने जमलेले सर्वजण एकमेकांकडे बघत होते.

‘‘ इन्सपेक्टर साहेब एकटेच आलात? खुनी महिलासुद्धा असू शकते! आपल्या सोबत महिला पोलिस कॉन्स्टेबल अपेक्षित होती.’’ अविनाशने असे म्हटल्यावर इन्सपेक्टर बागुलांनी वॉकीटॉकीवर काही सुचना केल्या आणि क्षणातच बोहर उभी असलेली महिला पोलिस कॉन्स्टेबल आत हजर झाली. सर्वांना समोर बसविल्यावर अविनाशने बोलण्यास सुरूवात केली.

‘‘तिळीच्या लाडूद्वारे विषाचे सेवन करण्यापूर्वी अशोकने इंग्रजीत चिठ्ठी लिहीली होती, त्यात लिहिले होते की ‘जीवनात हवे ते सर्व मला मिळाले, आता मला जगण्यात रस नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ ही चिठ्ठी अशोकच्याच हस्ताक्षरात लिहीली गेली आहे, हे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी हा आत्महत्येचा गुन्हा नोंदविला. मात्र राठी परिवाराचे फॅमिली डॉ.बच्छाव यांना अशोक आत्महत्या करणार नाही, असे वाटले आणि त्यांनी डिटेक्टिव्ह चौकशीचा आग्रह धरला आणि मला निमंत्रित केले. खरे तर अशोकच्या खोलीची तपासणी केल्यावर तो आत्महत्या करेल, असे मलाही वाटत नाही. त्याचे सर्व कपडे इस्त्री करून नीट आवरलेले असणे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने अभ्यासाच्या नोटस् काढणे, उद्या फुटबॉल मॅच आहे या दृष्टीने स्पोर्टस शूज स्वच्छ करून ठेवणे आणि फुटबॉल तयार ठेवणे या गोष्टी मला खटकल्यात. आत्महत्या करणारा मनुष्य आत्महत्ये अगोदर मानसिक दृष्ट्या अशांत असतो. तो उद्याचा विचार करत जगणारा नसतो. मात्र येथे सर्व निकष वेगळे होते. अशोक हा अतिशय आनंदात जगणारा आणि जीवनाकडे होकारात्मक दृष्टया बघणारा तरूण होता. म्हणून ही आत्महत्या नक्कीच नाही, हे मी मनात पक्के करून तपास सुरू केला. 
    अशोक मेल्यावर सर्वात जास्त फायदा कुणाचा, या बाजुने मी विचार केला. राठी परिवाराचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट पाठक यांच्याशी चर्चा केल्यावर मला समजले की या परिवाराची वारसाहक्काने येणारी सर्व संपत्ती राठीसेठ यांचे वडील म्हणजेच अशोकचे आजोबा यांनी अशोकच्या नावावर केली होती. अशोकचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर सर्व संपत्ती अशोकच्या नावावर होणार होती. पण अशोक मेल्यावर ही संपत्ती एकतर राठीसेठी किंवा मनीषा मॅडम यांच्या नावावर झाली असती. अशोक जीवंत राहिला असता तर ही संपत्ती त्यांना कधीच मिळाली नसती. या विचाराने अशोकचा खून एकतर राठीसेठ किंवा मनीषामॅडमांनी केला हे मी मनात निश्‍चित केले. राठीसेठ यांची चौकशी केल्यावर मला समजले की वारसाहक्काने अशोकच्या नावावर आजोबांनी केलेल्या इस्टेटीशिवाय राठीसेठ यांनी कितीतरी पट जास्त संपत्ती स्वकष्टाने मिळविली आहे. त्यामुळे त्यांनी खून करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून हा खून मनीषा मॅडमांनीच केला, असे मी जाहीर करतो.’’

अविनाशचे म्हणणे ऐकल्याबरोबर मनीषा चरफटत म्हणाली, ‘‘ एकही पुरावा नसतांना तुम्ही मला खुनी ठरवू शकत नाही आणि केवळ तुम्ही काढलेल्या तर्कानुसार पोलीस मला पकडणार नाहीत, नाही का इ. बागुल?’’

या प्रश्नाने इ. बागूल विचारत पडले आणि ते म्हणाले, ‘‘ अविनाश, आणखी काही पुरावे असतील तर सांग, नेहमीप्रमाणे विनाकारण रहस्य वाढवू नको.’’

‘‘ मनीषा मॅडम पुरावे भरपूर आहेत. मी विस्ताराने सांगतो. तुमच्या आणि राठीसेठ यांच्या वयात खूप अंतर आहे. तरी सुद्धा तुम्ही हा विवाह केवळ संपत्तीसाठी केला. सर्व काही व्यवस्थित सुरू असतांना अशोक दोन महिन्यांनी अठरा वर्षांचा होणार आणि सर्व इस्टेट त्याच्या नावावर होणार, याची जाणीव तुम्हाला नुकतीच झाली. म्हणून तुम्ही अशोकचा काटा काढण्याचे ठरविले. अलिकडेच तुम्ही इंग्लिश स्पिकींगचा कोर्स लावल्याचे मला समजले. येथे उपस्थित असलेले देवरेसर तुम्हाला शिकवितात. 
    काहीही कारण नसतांना इंग्लिश स्पिकींगचा कोर्स लावणे आणि इंग्रजी संभाषण आणि भाषांतर सुधारण्यासाठी अशोकची मदत घेणे हे तुम्ही नित्याचेच केले होते. काल काय झाले हे मी आता सर्वांना सांगतो, काल रात्री मनीषामॅडम अशोकच्या रूममध्ये आल्या. त्यांनी अशोकला काही मराठी वाक्य सांगून त्याचे इंग्रजीत भाषांतर करायला लावले आणि नंतर ते लिहून देण्याचा आग्रह केला. अशोकने त्याप्रमाणे भाषांतर लिहीले ते पुढीलप्रमाणे, ‘जीवनात हवे ते सर्व मला मिळाले, आता मला जगण्यात रस नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ मनीषा मॅडमांनी हे वाक्य लिहीलेला कागद लगेच ताब्यात घेतला आणि अशोकला तिळीचे लाडू खायला दिले. उद्या तुझी फुटबॉल मॅच आहे, म्हणून हा देवाचा प्रसाद तू खाल्लाच पाहिजे, असा आग्रह बहुधा मनीषा मॅडमांनी केला असावा. अशोकने ते लाडू खाल्ले, लाडूतील विषामुळे अशोकची शुद्ध हरपली. मनीषामॅडमांनी ती चिठ्ठी टेबलावर व्यवस्थित ठेवली आणि निघून गेल्या. सकाळी ५:३० वाजलेतरी अशोक का उठला नाही, हे बघण्यासाठी नोकराने अशोकच्या खोलीत डोकावले, तेव्हा अशोकच्या मृत्यूची वार्ता सर्वांना समजली.’’

‘‘ पुन्हा तर्क, मला ठोस पुरावा हवा आहे.’’ इ. बागुल अविनाशकडे बघून म्हणाले.

‘‘आता मी फक्त पुराव्यावर बोलणार आहे. तिळीच्या लाडूत विष कालवितांना आणि अशोकला लाडू देतांना विषाच्या काही अंशाने मनीषा मॅडमांच्या त्वचेवर रासायनिक क्रिया केली आणि त्यांचे हात काळपट झाले. ते हात कुणाला दिसू नये म्हणून त्यांनी हातमोजे घालून झाकून ठेवले.’’ अविनाशचे हे स्पष्टीकरण ऐकल्यावर इ. बागुलांनी महिला कॉन्सटेबला खुणावले. तिने मनीषा मॅडमांचे हातमोजे काढले. हाताच्या पंजावर विशिष्ट असे काळपट डाग स्पष्ट दिसत होते. चेहऱ्यावरची भिती स्पष्ट असतांनाही मनीषा ओरडून म्हणाली, ‘‘सकाळी नाश्ता करतांना त्यावर गरम वाफ आली आणि हात भाजले.’’

‘‘मला वाटलेच, तुम्ही असे उत्तर द्याल. म्हणून मी अगोदरच नोकरांची चौकशी केली. आज तुम्ही किचनमध्ये प्रवेश केला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तुम्ही कितीही ओरडून उपयोग नाही, पुढे फॉरेन्सीक तपासणीत आढळलेच की तुमच्या हाताच्या त्वचेवरील विषाचे अंश आणि अशोकच्या पोटातील अंश एकच आहे.इ. बागुल आता तुम्ही यांना अटक करू शकता.’’

‘‘पुरावा अजून सिद्ध झालेला नाही, म्हणून मला तुम्ही अटक करू शकत नाही.’’असे मनीषा मोठ्याने ओरडायला लागली. इन्सपेक्टर बागुलांना प्रश्न पडला की काय करायचे. हे बघून अविनाशने नेहमीचे अस्त्र काढले आणि तो म्हणाला,
‘‘अरे हो मॅडम, एक सांगायचेच राहिले. तिळीच्या लाडूच्या पॅकेटमध्ये सहा लाडू होते. दोन अशोकला दिले. उरलेले लाडू मला तुमच्या खोलीत सापडले. हा पुरावा तर तुम्ही नाकारू शकत नाही. ’’
अविनाशचे हे बोलणे ऐकताच मनीषा पटकन म्हणाली, ‘‘ तुम्ही खोटे बोलताय, उरलेले लाडू मी वॉशरूममध्ये फ्लश केले. तुम्हाला सापडणे शक्यच नाही. हा सुद्धा ठोस पुरावा नाही...’’ असे म्हणत मनीषा शांत झाली. उरलेले लाडू आपण फ्लश केले असे सांगून आपल्या तोंडून किती मोठी चूक झाली हे तिला उमगले. अप्रत्यक्षपणे आपण पुरावा अमान्य करून किती मोठी चूक केली याची जाणीव झाल्याने ती रडायला लागली आणि राठीसेठ यांच्याकडे बघून सॉरी म्हणू लागली.

‘‘अशोकच्या नावावर जेवढी इस्टेट जाणार होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त इस्टेट मी तुझ्या नावावर अगोदरच केली होती. तरी सुद्धा तुझे मन भरले नाही, तुला आता फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी चूप बसणार नाही.’’ असे म्हणत राठीसेठ मोठ्याने रडायला लागले.



खूनी सापडला |    Killer arrested

‘‘राठीसेठ, मनीषा अविवाहीत होती. तुमच्यात आणि तिच्या वयामध्ये कितीतरी अंतर आहे, तरी सुद्धा ती तुमच्याशी विवाहास तयार झाली तेव्हाच तुम्हाला शंका यायला हवी होती किंवा विवाहाच्या अगोदरच आजोबांनी अशोकच्या नावावर केलेल्या इस्टेटीविषयी तिला सांगायला हवे होते किंवा अशोकच्या नावावर आजोबांची इस्टेट जात असली तरी त्यापेक्षा कितीतरी जास्त इस्टेट तुझ्या नावावर आहे, अशी तुम्ही स्पष्ट कल्पना मनीषामॅडमांना द्यायला हवी होती. असे झाले असते तर आज अशोक जीवंत असला असता. सर्व इस्टेट अशोकच्या नावावर जाणार आणि तुम्ही मेल्यावर माझे काय होणार, या आर्थिक असुरक्षेच्या जाणीवेपायी मनीषा मॅडमांनी अशोकचा खून केला, यापेक्षा वेगळा निष्कर्ष या केसमधून निघू शकणार नाही.’’ असे सांगून अविनाश बाहेर आला. हातकडी लावलेली मनीषा जीपमध्ये बसून अतिशय द्देषपूर्ण नजरेने अविनाशकडे बघत होती. अविनाशला मात्र अशा नजरेची आता सवय झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या