खराखुऱ्या भूकंपाची जाणीव | Real earthquake awareness

Real earthquake awareness
earthquake awareness

खराखुऱ्या भूकंपाची जाणीव 

देशात भूकंप झाला तर कोणत्या शहरांना याचा सर्वाधिक फटका बसेल याची यादी राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने जाहीर केली आहे. त्यानुसार ‘धोकादायक’ आणि ‘अती धोकादायक’ अशी शहरांची विभागणी करण्यात आली. या यादीनुसार देशातील एकूण २९ शहरे गंभीर आणि अति गंभीर भूकंपप्रवण क्षेत्रात येतात.त्यामध्ये दिल्लीसह नऊ राज्यांच्या राजधान्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्राचा अतिभूकंपप्रवण क्षेत्रात समावेश असण्याच्या बाबीकडे आपल्याला गांभीर्याने बघावे लागणार आहे. 

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • भारतीय मानक ब्युरोचा अहवाल
  • अतिभूकंपप्रवण क्षेत्र विभाग पाच
  • विभाग चार
  • राष्ट्रीय भूकंप विज्ञान
  • भूकंपाच्या वेळी सामान्य सावधगिरी
  • निष्कर्ष

भारतीय मानक ब्युरोचा अहवाल | Report of Bureau of Indian Standards

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने ( Bureau of Indian Standards भारतीय मानक ब्युरो) देशाच्या भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करून भूकंपाचा धोका असणाऱ्या क्षेत्रांचा अहवाल तयार केला. हा अभ्यास करतांना भूकंपप्रवण क्षेत्र, आजवरच्या भूकंपाच्या नोंदी आणि झालेले नुकसान आदी नोंदींच्या आधारे त्यांनी क्षेत्रांची दोन ते पाच गटांत विभागणी केली. भारतीय हवामान खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या अहवालाच्या आधारे या केंद्राचे संचालक विनित गुल्हाटी यांनी अत्यंत महत्त्वाचे अनुमान मांडले. त्यानुसार उपलब्ध माहितीच्या आधारे गट दोनमध्ये कमी भूकंप, तर गट चार आणि पाचमध्ये भूकंपाची जास्त शक्यता असणाऱ्या क्षेत्रांचा समावेश आहे. 

    केवळ शहरांचा विचार केल्यास दिल्ली, पाटणा (बिहार), श्रीनगर (जम्मू काश्मीर), कोहिमा (नागालॅँड), पुद्दुचेरी, गुवाहाटी (आसाम), गंगटोक (सिक्कीम), सिमला (हिमाचल प्रदेश), डेहराडून (उत्तराखंड), इंफाळ (मणिपूर) आणि चंडीगड ही शहरे चार आणि पाच या गटात मोडतात. या शहरांची एकूण लोकसंख्या तीन कोटींच्या घरात आहे. तर एकूणच क्षेत्राचा विचार केल्यास भूकंप गटाची विभागणी खालील प्रकारे करण्यात आली आहे. 

अतिभूकंपप्रवण क्षेत्र विभाग पाच- 

विभाग पाचमध्ये म्हणजे अतिभूकंपप्रवण क्षेत्रात ईशान्येकडील भूभागाचा समावेश होतो; तसेच जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील रण आणि कटोच, बिहारमधील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे. 

विभाग चार- 

जम्मू काश्मीरचा काही भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशाचा उत्तरेकडील भाग, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही लहान भूभागांचा समावेश या विभागामध्ये होतो. 
काही दिवसांपासून राजकारणातील भूकंपांच्या बातम्या गाजत आहेत. सुरूवातीला राहूल गांधीनी नरेंद्र मोदींबाबत विशिष्ट माहिती प्रकाशित करून भूकंप घडवून आणेल अशी घोषणा केली. नंतर ही घोषणा फुसका बार निघाली. मात्र तेव्हापासूनच राजकारणात भूकंप हा शब्द रूढ झाला, असे वाटते. अलीकडे नितीश कुमार यांचे राजीनामा नाट्य आणि भाजपच्या सहाय्याने पुन्हा मुख्यमंत्री बनणे, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कोर्टाच्या आदेशाने दिलेला राजीनामा अशा अनेक घडामोडींनी राजकीय भूकंप घडविले. या बातम्यांमुळे जनतेचे चांगले मनोरंजन झाले. 
    मात्र राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नुकत्याच प्रकशित केलेल्या अहवालामुळे खराखुऱ्या भूकंपाची चाहूल जनतेला जाणवू लागली आहे. भारताने या अगोदर कितीतरी खऱ्या भूकंपाचा सामना केला आहे, त्यातील जीवित आणि आर्थिक हानीचे आकडे अजुनही मनाला चटका लावतात. भूकंप केंद्राच्या या अहवालामुळे भूकंप झाला तर सुरक्षिततेचे उपाय, भूकंप्रतिरोधक इमारती, भूकंपासंबंधी आपली आणि सरकारची नेमकी भूमिका या सर्व बाबी आता चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये भूकंपाबाबत जनजागृती होऊन त्याचा फायदाच आपल्याला होणार आहे. 

    चक्रिवादळे, पूर हल्लीच्या काळात बरीचशी पूर्वसूचना देऊन येतात, सॅटेलाईटच्या मदतीने त्यांचा पूर्वअंदाज बांधता येतो. त्या अंदाजानुसार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी थोडा का होईना, वेळ असतो. पण भूकंपाच्या बाबतीत मात्र आपण बेसावधच पकडले जातो. वास्तविक पाहता पृथ्वीच्या पोटात चाललेल्या अनेक प्रक्रियांमुळे अनेकदा जमिनीचे स्तर हलतात. ही प्रक्रिया कमी अधिक प्रमाणात सर्वत्र आणि सतत चालत असली तरी तिचे परिणाम दरवेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर राहणाऱ्या लोकांना/प्राण्यांना जाणवतातच असे नाही. काही ठिकाणी हे परिणाम जास्त जाणवतात याचे कारण ह्या घडामोडी जमिनीच्या किती खोलवर चालू आहेत तसेच जमिनीच्या वेगवेगळ्या थरांची रचना कशी आहे इत्यादींवर हे अवलंबून असते. 

भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोमीटरचा -Seismometer वापर केला जातो. हे यंत्र जमीनीच्या पृष्ठभागावर ठेवले जाते. यंत्रामध्ये जमीनीच्या कंपनाची व केंद्राची नोंद होते. आलेखाच्या माध्यमातून भूकंप माहीत होतो. याबरोबर तीव्रता समण्यासाठी रिश्टर स्केलचा ( Richter scale ) वापर केला जातो. त्यामुळे भूकंपाच्या नुकसानीचा अंदाज रिश्टर स्केलवरून समजण्यास मदत मिळते. मात्र भूकंपामुळे होणाऱ्या जीवित आणि आर्थिक नुकसानाचा रिश्टर स्केलशी थेट संबंध अनेकवेळा आढळत नाही. कारण भूकंपामुळे होणारी मनुष्यहानी बरेचदा केवळ भूकंपाच्या तीव्रतेवर (स्केलवर) अवलंबून नसते, तर अनेकदा भारतासारख्या देशातली प्राणहानी ही विशेषतः चुकीच्या पद्धतीने राहण्याच्या इमारती बांधल्या गेल्याने तसेच हानी टाळण्याच्या इतर मार्गांकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे होत असते. 

    विविध माहितीच्या आधारे असे आढळते की, जेव्हा भूकंप हे विकसित देशात होतात, तेव्हा ही हानी अत्यंत कमी होते किंवा कधीकधी होतही नाही. याचे मुख्य कारण म्हणजे इमारतींच्या रचनेचे आणि प्रकारांमधले प्रमाणीकरण, आणि इमारती अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्याची धडपड. आपल्याकडे दुर्दैवाने ही जाणीव विशेष दिसत नाही. 

भूकंपामुळे होणारे जीवित आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहणे योग्य नाही तर भविष्यात हानी होऊ नये किंवा कमीत कमी व्हावी यासाठी आपण आपल्या घरापासूनच काळजी घेण्यास सुरूवात करायला हवी. भूकंप झाल्यास होणारी हानी कमीतकमी होईल यासाठी जनतेने कोणती खबरदारी घेतली पाहिजे यासंबधी परदेशांमध्ये विशेषत: प्रगतदेशांमध्ये खूप काळजी घेतली जाते. त्यासंबधी पुस्तक, वेबसाईट, बॅनर आणि वर्तमानपत्रांद्वारे माहिती प्रकाशित केली जाते. 

    जपानमध्ये तर भूकपानंतरची स्थिती कशी हाताळावी, याचे वेळोवेळी सराव प्रात्यक्षिकही घेतले जाते. आपल्या देशात याबाबींकडे दुर्लक्ष होते असे नाही. भूकंपानंतर काय काळजी घ्यावी याबाबत भारत सरकारनेही वेळोवेळी माहितीचा प्रसार केला आहे. पण त्या सूचना लोकांपर्यंत खरोखरच पोहोचल्या का आणि लोकांनी त्या गांभीर्याने घेतल्या का याकडे मात्र कुणीही गंभीरतेने बघितलेले नाही. 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान | National Center for Seismology

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने नुकत्याच प्रकाशित केलेल्या या अहवालामुळे जनतेला ‘जागते रहो’ चा इशारा मिळाला आहे. भूकंप होईल म्हणून जागत बसणे, असा याचा अर्थ नाही. आपण राहात असलेली घरे कितपत सुरक्षित आहेत, त्यांना सुरक्षित करण्यासाठी काय करता येईल, भुकंपप्रतिरोधक इमारती कशा बांधता येतील? आपण झोपतो कुठे? भूकंप झाला तर कोणते सुरक्षिततेचे उपाय योजू शकतो, भूकंप होण्यापूर्वी, भूकंप झाल्यानंतर आणि धक्का ओसरल्यानंतर कोणती काळजी घ्यायची या प्रश्‍नांची उत्तर शोधणे हा या अहवालामागील हेतू आहे. या संदर्भातील माहिती सरकारने वेळोवेळी प्रसारित झालेली आहे. ती नीट वाचून, समजून घेण्याची गरज आहे. त्यासंबधी सरावही करण्याची गरज आहे. 

भूकंपाच्या वेळी सामान्य सावधगिरी | General precautions during an earthquake

भूकंपाच्या वेळी, तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. भूकंपाच्या वेळी खालील काही सामान्य सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे:
  • ड्रॉप करा, झाकून ठेवा आणि धरा:  जमिनीवर पडा, फर्निचरच्या मजबूत भागाखाली आसरा घ्या  (जसे की टेबल किंवा डेस्क), आणि भूकंपाचे थरथरणे थांबेपर्यंत तेथेच थांबा. असे करणे  आपल्याला पडणाऱ्या वस्तू आणि मोडतोडपासून संरक्षण करण्यास मदत करते.
  • घरातच रहा: तुम्ही घरामध्ये असाल तर तिथेच रहा. भूकंपाच्या थरथरत्या वेळी बाहेर पळू नका, कारण तुम्हाला मलबा पडण्याचा धोका असू शकतो. या मलब्यापासून सुरक्षेतेसाठी कव्हर घेण्यासाठी सुरक्षित जागा शोधा.
  • खिडकीपासून दूर राहा:  भूकंपाच्या वेळी खिडक्या, काच आणि आरशाजवळ उभे राहणे टाळा. कारण भूकंपाच्या थरथरण्यामुळे काच फुटू शकतात. 
  • बाहेर असल्यास, खुल्या भागात जा: तुम्ही बाहेर असल्यास, इमारती, झाडे, पथदिवे आणि युटिलिटी वायरपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेत जा. कारण भूकंपाच्या वेळी या वास्तू कोसळू शकतात.
  • गाडी चालवत असल्यास, पुल ओव्हर: तुम्ही गाडी चालवत असाल तर ओव्हरपास, पूल आणि उंच इमारतींपासून दूर असलेल्या सुरक्षित ठिकाणी जा. थरथरणे थांबेपर्यंत वाहनाच्या आतच रहा.
  • लिफ्ट वापरू नका: भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर टाळा. कारण एकतर थरथरण्यामुळे लिफ्ट बंद पडू शकते किंवा वीज बंद केली जाऊ शकते. थरथर सुरू असताना तुम्ही लिफ्टमध्ये असाल, तर जवळच्या मजल्यावर थांबल्यावर शक्य तितक्या लवकर बाहेर पडा.
  • आपले डोके आणि मान संरक्षित करा: जर तुम्हाला फर्निचरखाली आवरण सापडत नसेल, तर तुमचे डोके आणि मान तुमच्या हातांनी सुरक्षित करा आणि खिडक्यांपासून दूर असलेल्या आतील भिंतीवर आश्रय घ्या.
  • आफ्टरशॉकसाठी तयार रहा: थरथरणे थांबले म्हणजे तुम्ही बिनधास्त जळत असे समजू नका. कारण मुख्य भूकंपानंतर आफ्टरशॉक येऊ शकतात. अतिरिक्त हादरायला तयार राहा आणि सुरुवातीच्या भूकंपाच्या वेळी सारखीच सुरक्षा खबरदारी घ्या.
  • इमर्जन्सी किट घ्या:  पाणी, नाशवंत अन्न, फ्लॅशलाइट, प्रथमोपचार पुरवठा आणि महत्त्वाच्या कागदपत्रांसह अत्यावश्यक वस्तूंसह आपत्कालीन किट नेहमी घरात बाळगा. 
  • तुमचे सुरक्षित क्षेत्र ( सफाई झोन) जाणून घ्या: तुमच्या घरातील आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित क्षेत्रे ओळखा, जसे की मजबूत टेबल किंवा डेस्क खाली. कुटुंबातील सदस्यांना आणि सहकाऱ्यांना या सुरक्षित क्षेत्रांबद्दल शिकवा.
  • शांत राहणे: भूकंपाच्या वेळी शक्य तितके शांत राहा. भीतीमुळे निर्णयक्षमता खराब होऊ शकते. तुमच्या सुरक्षिततेवर आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करा.
  • आपत्कालीन माहितीसाठी ऐका: थरथरणे थांबल्यानंतर, बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओ किंवा इतर माध्यमातून आणीबाणीची माहिती ऐका. बाहेर काढण्याचे आदेश किंवा इतर सूचनांबद्दल जागरूक रहा.
लक्षात ठेवा भूकंप चेतावणीशिवाय होऊ शकतात, त्यामुळे तयार राहणे आणि भूकंपाच्या थरथरणाऱ्या वेळी काय करावे हे जाणून घेणे तुमच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे. नियमित भूकंप कवायती (मॉकड्रील) आणि सुरक्षा उपायांचा सराव केल्याने आपल्याला आवश्यकतेनुसार जलद आणि प्रभावीपणे प्रतिक्रिया देण्यास मदत होऊ शकते.

निष्कर्ष ( Conclusion)-

भूकंपाची केवळ भीती बाळगणे जसे उपयोगाचे नाही तसेच भूकंपाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करणेही घातक आहे. भूकंपाचा धोका आपल्याला आणि आपल्या कुटुंबातील लोकांना सर्वात पहिले आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने अहवाल प्रकाशित करून त्यांचे काम केले, त्या अहवालाचा विचार करून आपण स्वत:, कुटुंबाची आणि इमारतीची कशी काळजी घ्यावी हे काम मात्र आपल्यालाच करावे लागणार आहे.

- योगेश रमाकांत भोलाणे
Read more about author

---------------------------------
हे सुद्धा वाचा-

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या