कृषी दर्शनातून कृषी विकास | Agricultural Development through Agriculture Tourism

AGRICULTURAL DEVELOPMENT THROUGH AGRICULTURE TOURISM
agri-tourism

कृषी दर्शनातून कृषी विकास 

Agricultural Development through Agriculture Tourism

महाराष्ट्रातील कृषि पर्यटन असो किंवा कर्नाटकातील कृषी दर्शन असो अशा कार्यक्रमांमुळे कृषीशी संबध नसलेल्या लोकांचा आणि मुलांचा थेट कृषी क्षेत्राशी संबध जोडला जाणार आहे आणि यातूनच उत्तम प्रकारे कृषी विकास साधला जाणार आहे. दूरदर्शन जेव्हा सुरू झाले, तेव्हा त्याच्या सुरूवातीच्या काळात कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं हे कार्यक्रम खूप गाजले. गंमत अशी की ज्यांचा शेतीचा काहीही संबंध नाही, असे लोक सुद्धा हे कार्यक्रम बघत, त्याला कारण म्हणजे तेव्हा दूरदर्शनवर फक्त एकच चेनेल होते. तेव्हा पासून सर्व लोकांना कृषी दर्शन कार्यक्रमातून कृषीशी संबध आला. सध्या या डिजीटल युगात कृषी दर्शन मात्र विविध प्रकारे घडविले जाते.

या लेखातील महत्त्वाचे मुद्दे

  • इकोऍग्रो टुरिझम कंपनी
  • कृषी पर्यटनाकडे कल
  • सर्व शिक्षण अभियान योजना
  • निष्कर्ष

इकोऍग्रो टुरिझम कंपनी | Eco-agro tourism company

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या ( नाबार्ड) सहकार्यातून सातारा जिल्ह्यातील तापोळा धरणग्रस्त शेतकरी युवकांनी राज्यात पहिल्यांदा इकोऍग्रो टुरिझम कंपनी उघडली. सुरूवातीला या युवकांनी नाबार्डच्या माध्यमातून टुरिझमचे ३० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर या तरूणांनी त्यांच्या टूरिझम कंपनी अंतर्गत महाबळेश्‍वर कृषी दर्शन ही राज्यातील पहिली नोंदणीकृत संस्था स्थापन केली. 

    सध्या महाबळेश्‍वर कृषी दर्शनसाठी एका पर्यटकाला ७०० ते १२०० रूपये आकारले जातात, यात राहण्याची व्यवस्था, दोन वेळचे जेवण व अल्पोपहार याचा समावेश असतो. परिसरातील किल्ला, कोयना अभयारण्य, नागेश्‍वर लेणी, तेहरी नद्यांचा संगम, दत्त मंदिर आणि यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवार फेरी व शेततळ्यातील मासेमारी यांचा आनंद पर्यटकांना लूटता येतो. पर्यटकांना कृषी दर्शनाची पद्धत येथूनच सूरू झाली. अन्यथा आतापर्यंत प्रेक्षणीय स्थळे, मंदिर, किल्ले आदीच दाखविले जात होते. आता शेतातच योग्य असे बदल करून कृषी पर्यटन या कृषि आधारित उद्योगाची अनेक शेतकर्‍यानी सुरूवात केली आहे. दरवर्षी त्यात भर पडत आहे. 

    कृषी पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना गावातील शेती, शेतीतील गमती जमती, बाजारपेठ, गावाची रचना, ग्रामपंचायत, चावडी, सहकारी चळवळ, जातीय सलोखा, गावातील शिक्षण पद्धती, खाद्य संस्कृती, धार्मिक स्थळे यांचे दर्शन घडविले जाते. शेतीमध्ये पर्यटकांना डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, कांदा, भाजीपाला आदी प्रकारची पिके, हरितगृहे, शेडनेट, शेततळी, शीतगृह, पिकवण गृह, दुग्ध व्यवसाय, पशुधन असे विविध प्रकारे कृषी दर्शन घडविले जाते. काही शेतकऱ्यांनीतर पर्यटकांना राहण्यासाठी शेतातच खोल्या आणि पर्णकुटी उभारल्या आहेत. तेथे वास्तव्यास असतांना त्यांच्या करमणुकीसाठी मचाण, झोके आदींची व्यवस्था केली आहे. काही शेतकऱ्यांनी तर शेती अवजारे संग्रहालय बनवून पर्यटकांना चांगलेच आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या संग्रहालयात पर्यटकांना शेतीच्या जुन्या वस्तुंचा संग्रह, टांगा, बैलगाडी, शेतीतील पिकांच्या अवशेषांपासून बनविलेल्या विविध वस्तू बघायला मिळतात. कृषी पर्यटन उद्योगातून कृषी दर्शन घेण्यासाठी आता लोक चांगलेच आकर्षित होऊ लागले आहेत. 

    कृषी पर्यटनाला जास्तीतजास्त प्रसिद्ध देण्यासाठी शेतकऱ्यांनी संगणक आणि इंटरनेटचा खूप चांगला उपयोग करून घेतला आहे. कारण सध्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देणाऱ्या लोकांपैकी ८० टक्के लोक संकेतस्थळ व फेसबूकवरून, तर २० टक्के लोक कानोकानी मिळालेल्या माहितीवरून येत आहेत. कृषी दर्शनाच्या कृषि पर्यटन केंद्राच्या माध्यमातून शहरी पर्यटकांशी ग्रामीण भागातील शेतीची थेट जोडणी झाली. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचा नवा पर्याय उपलब्ध झाला. भाजीपाला, धान्य, फळे आदी शेतीमालाची पर्यटक थेट शेतकऱ्यांच्या शेतीवरून आता खरेदी करत आहेत. अनेक पर्यटक शेतीमालाची वार्षिक खरेदी गावातील शेतकऱ्यांकडून करत आहेत. तसेच पर्यटकांना फिरण्यासाठी बैलगाडी, ट्रॅक्टर, कृषी दर्शनासाठी स्थळदर्शन यातून गावातील इतर शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. पर्यटक कृषी दर्शनासाठी येतांना त्यांच्या कुटूंबासमवेत येतात. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांना अन्न तयार होण्याची माती ते ताटापर्यंतची प्रक्रिया बघायला मिळते. अन्न तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यातील कष्ट पाहून मुलांनी ताटात उष्टे टाकण्याचे थांबवले आहे, अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. 

कृषी पर्यटनाकडे कल | Trend to agri-tourism

कृषि पर्यटनासोबतच कृषि प्रदर्शनातून कृषि दर्शन घेण्याकडे अलिकडे शेतकऱ्यांचा कल खूप वाढलेला आहे. अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांना विविध कंपन्यांच्या स्टॉलवरून त्यांच्या उत्पादनाची माहीती तर मिळतेच, शिवाय अशा प्रदर्शनातून शेतमालाची आणि शेतमालावर प्रक्रिया केलेल्या मालाची विक्री सुद्धा करता येते. देश-परदेशातील आधुनिक तंत्र, शेतीकामासाठी तयार केलेली नवनवीन यंत्रे आदींची एकाचठिकाणी माहीती केवळ अशा प्रदर्शनातून शेतकऱ्यांना मिळू शकते. सेंद्रीय खतांचा वापर करून पिकविलेल्या शेतमालाचे खास प्रदर्शन आणि विक्री अशा स्वरूपाची प्रदर्शने ग्राहकांचा आता उत्तम प्रतिसाद मिळवू लागली आहेत. 
    दूरदर्शन, रेडिओ, कृषि पर्यटन, कृषि दर्शन अशा अनेक माध्यमातून शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना शेतीविषयक जीवनाचे जवळून कृषि दर्शन होत असते. अलिकडे आलेली संगणक, मोबाईल, इमेल, एसएमएस अशी डिजीटल माध्यमे सुद्धा लोकांना कृषि दर्शन घडविण्याचे काम करीत आहेत. कृषि शिक्षणासंबधी कृषि विद्यापीठांद्वारे सुरू असणारे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना एक प्रकारे कृषि दर्शनच घडवित असतात. महाराष्ट्रात प्रत्येक विद्यार्थ्याला कृषि संबधी प्राथमिक माहिती असावी म्हणून शालेय शिक्षणात कृषि विषय बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न झाले होते, काही कारणास्तव अजुनही हा निर्णय झालेला नाही. 

    थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाला कृषि दर्शन घडावे, शेतीसंबधी जीवनाचा प्रत्येकाने अभ्यास करून वैज्ञानिक दृष्टीने शेती कशी करता येईल, याचा विचार करावा, याबाबत आपण बरेच प्रयत्न करित असतो. कदाचितच अशा प्रकारे प्रयत्न इतर क्षेत्रात केले जात असावेत. महाराष्ट्रात जरी शालेय जीवनात कृषि शिक्षणाचा मुद्दा रखडला असलातरी कनार्टक राज्य मात्र आपल्या एक पाऊल पुढे गेले आहे. 

सर्व शिक्षण अभियान योजना | Sarva Shikshan Abhiyan Yojana

विद्यार्थिदशेतच शेतीची गोडी लागावी या हेतूने कनार्टक राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी कृषी दर्शन योजना आखली आहे. सर्व शिक्षण अभियान योजनेअंतर्गत सर्व सरकारी शाळांतून ही योजना राबविण्यात येणार आहे. ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान होणार्‍या या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना शेतीची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम २००५ मधील शिफारशीनुसार शेतीविषयक संपूर्ण माहिती अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. मात्र, त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊनच दाखविले जाणार आहे. ही सर्व योजना कृषि दर्शन या नावाने राबविण्यात येणार आहे. 
    या योजनेमुळे विद्यार्थी शेतीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच बागायत, जैविक इंधन, शेतीचा पाणीपुरवठा, दुग्ध व्यवसाय याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत कृषि व्यवसायाचे जवळून दर्शन घडणार आहे. लहानपणापासूनच जर विद्यार्थ्यांना योग्य माहिती दिली तर शेतीमध्ये चांगले करिअर करता येते, आधुनिक पद्धतीने शेती केली तर आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो हे विद्यार्थ्यांना या कृषि दर्शन योजनमुळे पटवून देता येणार आहे. नोकरीच्या मागे न लागता जर कृषी व्यवसाय केला तर भविष्यात कुणीही उपाशी राहणार नाही, हाच संदेश खरंतर कनार्टक सरकारला या योजनेतून द्यायचा आहे. 
    रेडीओ, टीव्ही, मोबाईल किंवा इंटरनेटच्या तुलनेत विद्यार्थ्यांना कृषी जीवनाचे जवळून आणि योग्य प्रकारे दर्शन घडविण्यासाठी ही योजना चांगली परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. या सरकारची केवळ ही घोषणा नसून सरकारने यासाठी निधी उपलब्ध करण्यासंबधी चांगली तरतूद केली आहे. कृषि स्थळांना भेटी देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्या दिवशी सकाळचा नाश्ता, माध्यान्ह आहार, नोटबूक, पेन आदी खर्चासाठी प्रत्येकी १५० रूपये दिले जाणार आहेत. कर्नाटकातील ३० जिल्ह्यांमधून आठ हजार १०० संघ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात २५ विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. आठवीतील एकूण दोन लाख दोन हजार ६०२ विद्यार्थ्यांना कृषी दर्शनचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण मोहिमेसाठी एकूण तीन कोटी रूपये कर्नाटक सरकार खर्च करणार आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट् म्हणजे कृषी शिक्षण फक्त ङ्गळ्यावरच नाहीतर प्रत्यक्ष शेतात जाऊन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशा या अभिनव योजनचे चांगले परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन शेतीमध्ये भविष्यात चांगले व्यावसायिक निर्माण होऊ शकणार आहेत. 

निष्कर्ष ( Conclusion)-

देशातील इतर सर्व राज्यांमध्ये कृषी संबधी अनेक कार्यक्रम राबविले जातात, त्या सर्व राज्यांना आता या कृषि दर्शन योजनेमुळे एक चांगली परिणामकारक योजना राबविण्यासाठी मिळणार आहे. देशातील सर्वच राज्ये या योजनेचे स्वागत करतील आणि विद्यार्थी दशेतच कृषी व्यवसायाची बिजे विद्यार्थ्यांच्या मनात कोरतील, अशी आशा करू या.

टिप्पणी पोस्ट करा

Please comment here if you have any question.

थोडे नवीन जरा जुने

इतके स्वस्त कपडे कधीच नव्हते, amazon वर आताच विकत घ्या